भिवंडीत विमुक्त जाती व भटक्या जमातींसाठी विशेष शिबीर संपन्न विविध दाखले आणि शासकीय योजनांचा शेकडो नागरिकांना लाभ
*भिवंडीत विमुक्त जाती व भटक्या जमातींसाठी विशेष शिबीर संपन्न*
*विविध दाखले आणि शासकीय योजनांचा शेकडो नागरिकांना लाभ*
ठाणे,दिनांक : २९ सप्टेंबर २०२६ : ठाणे जिल्हाधिकारी, भिवंडी उपविभागीय अधिकारी आणि भिवंडी तहसिलदार कार्यालयांच्या संयुक्त विद्यमाने कामतघर हद्दीतील नारपोली शिवाजी नगर येथील विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांसाठी एका विशेष दाखले व प्रमाणपत्र वाटप शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
राहणाळ येथील आगरी उन्नती समाज मंडळ येथे पार पडलेल्या या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिरास निवासी नायब तहसिलदार विशाल इंदुलकर, माजी सरपंच राजेंद्र मढवी, ग्रामपंचायत सदस्य पंकज पाटील, आगरी समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष नामदेव पाटील, सामाजिक कार्यकर्ते नंदू भाऊ पवार, सामाजिक कार्यकर्त्या इंदुबाई चव्हाण, सरपंच प्रताप पाटील, मंडळ अधिकारी योगेश भोजने, सुरेश राठोड, अविनाश राऊत आणि राहणाळच्या ग्राम महसूल अधिकारी संजीवनी वानखडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना एकाच छताखाली विविध शासकीय सेवा व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. यामध्ये ३५ उत्पन्नाचे दाखले, ३६ अधिवास व रहिवासी प्रमाणपत्रे, २ नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रे आणि ५ नवीन शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले. तसेच २१ नागरिकांनी आधार नोंदणी व दुरुस्तीचा लाभ घेतला.
आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा योजनांतर्गत ४९ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. याशिवाय ४६ आभा कार्ड, २९ आयुष्यमान भारत कार्ड वितरित करण्यात आले.
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे १० आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे १० अर्ज मंजूर करण्यात आले.
या उपक्रमात इतर मागास बहुजन कल्याण विभाग, ठाणे यांच्या वतीने तब्बल १५० लाभार्थ्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, शिष्यवृत्ती आणि स्वयंरोजगार योजनांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, उपविभागीय अधिकारी अमित सानप या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सेतू केंद्र, ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, आरोग्य विभाग आणि पुरवठा विभाग यांच्या उत्कृष्ट समन्वयामुळे हे शिबीर सुरळीत व यशस्वीपणे पार पडले,अशी माहिती तहसिलदार अभिजीत खोले यांनी दिली.
🙏👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇🙏




Comments