*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अंबरनाथ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा शुभारंभ..!*

                                                                *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अंबरनाथ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा शुभारंभ..!*

     *ठाणे,दिनांक:- 09 ऑक्टोबर 2024:-* ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा उद्घाटन समारंभ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, वैद्यकीय शिक्षण हसन मुश्रीफ हे मान्यवर दूरदृश्यप्रणाली द्वारे उपस्थित होते.

   तर ठाणे जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे या कार्यक्रमाचा थेट प्रक्षेपण सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी आमदार संजय केळकर, आमदार डॉ.बालाजी किणीकर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संतोष वर्मा, अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये-धुळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, उपजिल्हाधिकारी विकास गजरे, हरिश्चंद्र पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे, डॉ.अर्चना पवार, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी भरत साळुंखे, मनोज सयाजीराव तसेच जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी, वैद्यकीय क्षेत्रातील विविध मान्यवर, विद्यार्थी उपस्थित होते.







     सर्वांसाठी परवडणारी आणि सहज उपलब्ध आरोग्यसेवा सुनिश्चित करण्याच्या वचनबद्धतेला अनुसरून, पंतप्रधानांनी महाराष्ट्रात मुंबई, नाशिक, जालना, अमरावती, गडचिरोली, बुलढाणा, वाशीम, भंडारा, हिंगोली आणि अंबरनाथ (ठाणे), या 10 ठिकाणच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांचे कार्यान्वयन सुरू केले. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या वाढीव जागांसह या वैद्यकीय महाविद्यालयांच्या माध्यमातून रुग्णांना प्रगत आरोग्य सेवा देखील पुरविली जाणार आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रात सुमारे 7600 कोटी रुपयांहून जास्त मूल्याच्या विविध विकास प्रकल्पांची दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून पायाभरणी केली. या प्रकल्पांमध्ये महाराष्ट्रातील 10 सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांसह नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नूतनीकरण प्रकल्पाची पायाभरणी आणि शिर्डी विमानतळावरील नव्या एकात्मिक टर्मिनल इमारतीची पायाभरणी आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कील्स (IIS), मुंबई आणि विद्या समीक्षा केंद्र, महाराष्ट्र (VSK) यांचे उद्घाटनही त्यांनी यावेळी केले. महाराष्ट्रातील 10 सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील वैद्यकीय महाविद्यालयाचाही समावेश आहे.

     या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनोगत व्यक्त करताना आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी सांगितले की, अंबरनाथ शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, यासाठी गेली काही वर्षे प्रयत्न सुरु होते. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा केंद्र आणि राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि लोकप्रतिनिधींच्या या पाठपुराव्यामुळे अंबरनाथच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयाला मंजुरी मिळाली होती. याच पार्श्वभूमीवर आज राज्यातील दहा नव्या वैद्यकीय महाविद्यालयाचा शुभारंभ सोहळा पार पडला. याअंतर्गत अंबरनाथ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा शुभारंभ करण्यात आला.

     जिल्हाधिकारी अशोक शिनगारे म्हणाले की, हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, असे स्वप्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहिले होते. ते स्व्पन आज साकार होत आहे, याचा माझ्यासह जिल्ह्यातील सर्वांनाच मनस्वी आनंद होत आहे. खासदार डॉ.श्रीकांत शिंदे स्वत: वैद्यकीय क्षेत्रातील उच्च विद्याविभूषित आहेत. त्यामुळे ते या वैद्यकीय महाविद्यालयाचे महत्व जाणून आहेत. यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न सर्वार्थाने कौतुकास्पद आहेत. त्यांना दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी व जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी दिलेली साथ मोलाची आहे. हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जिल्ह्यातील विविध मानाच्या तुऱ्यांपैकी एक मानाचा तुरा असेल.

     अधिष्ठाता डॉ. संतोष वर्मा यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, १०० विद्यार्थी क्षमता आणि ४३० खाटांचे रूग्णालय, अशी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची रचना आहे. यासाठी अंबरनाथ पूर्वेतील २१ एकर आरक्षित जागेवर इमारत उभारण्यासाठीही यापूर्वीच मंजुरी आणि ४०३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून दि.१२ नोव्हेंबर रोजी पहिला वर्ग भरणार आहे. सद्य:स्थितीत अंबरनाथ ग्रीन सिटी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात आणि अंबरनाथ पश्चिम येथील डेंटल महाविद्यालयाच्या इमारतीमध्ये १०० विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण दिले जाणार आहे. महाविद्यालयाच्या आणि रुग्णालयाच्या मुख्य इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध होणार आहे. या महिन्याच्या ५ तारखेपासून विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून दि.१२ नोव्हेंबर पासून विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू होणार आहेत. एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी आवश्यक सर्व प्रकारची तयारी महाविद्यालय व्यवस्थापनाकडून पूर्ण करण्यात आली आहे. यासाठी आवश्यक प्राध्यापकांची भरती पूर्ण झाली असून प्रयोगशाळा, सामुग्री, वर्ग, विद्यार्थ्यांच्या रहिवासासाठी वसतीगृहाचे पर्यायही उपलब्ध झाले आहेत.

     या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.तरुलता धनके यांनी केले तर आभार प्रर्शन डॉ.अनुजा पवार यांनी केले.

     या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान श्री.मोदी म्हणाले की, महाराष्ट्राला 10 नवीन वैद्यकीय महाविद्यालये आणि नागपूर विमानतळाचे आधुनिकीकरण आणि विस्तार तसेच शिर्डी विमानतळावरील नव्या एकात्मिक टर्मिनल इमारतीची उभारणी या प्रकल्पांसह महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची भेट दिली जात आहे. याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेचे आजच्या विकास प्रकल्पांसाठी अभिनंदन.

     मराठीला अभिजात भाषा म्हणून नुकत्याच मिळालेल्या दर्जाची आठवण करून देताना पंतप्रधान म्हणाले की, जेव्हा एखाद्या भाषेला योग्य तो सन्मान मिळतो तेव्हा केवळ शब्दांनाच नव्हे तर संपूर्ण पिढीला आवाज मिळतो. यामुळे कोट्यवधी मराठी बांधवांचे स्वप्न साकार झाले आहे. महाराष्ट्रातील प्रगतीची कामे छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले या महान विभूतींच्या आशीर्वादामुळेच सुरू आहेत, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

     गेल्या 10 वर्षांत सरकारने देशाच्या विकासासाठी आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा ‘महायज्ञ’सुरू आहे असे पंतप्रधान म्हणाले. “आज आपण केवळ इमारती बांधत नाही तर निरोगी आणि समृद्ध महाराष्ट्राचा पाया रचत आहोत”, असे सांगत त्यांनी लाखो लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी राज्यात 10 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन करण्यात आल्याचे नमूद केले.  

     ठाणे, अंबरनाथ, मुंबई, नाशिक, जालना, बुलढाणा, हिंगोली, वाशीम, अमरावती, भंडारा आणि गडचिरोली हे जिल्हे लाखो लोकांसाठी सेवेची केंद्रे बनतील, असे ते म्हणाले. 10 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांमुळे महाराष्ट्रात आणखी 900 वैद्यकीय जागा तयार होतील आणि राज्यातील एकूण वैद्यकीय जागांची संख्या सुमारे 6 हजार होईल असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. लाल किल्ल्यावरून देशात 75 हजार नवीन वैद्यकीय जागा निर्माण करण्याच्या आपल्या संकल्पाची आठवण करून देत पंतप्रधान म्हणाले की,  आजचा कार्यक्रम या दिशेने उचललेले एक मोठे पाऊल आहे. संपूर्ण देशात वैद्यकीय विद्यार्थी प्रवेश संख्या 1 लाख पूर्ण झाली आहे.

     सरकारने वैद्यकीय शिक्षण सुलभ केले आहे, असे सांगून पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील तरुणांसाठी नवीन संधींची दारे खुली झाल्याचे नमूद केले.  गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील जास्तीत जास्त मुले डॉक्टर व्हावीत आणि त्यांची स्वप्ने पूर्ण व्हावीत, हे सरकारचे प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले. 

     श्री.मोदी म्हणाले की, एकेकाळी अशा प्रकारच्या विशेष अभ्यासासाठी मातृभाषेतील पुस्तके उपलब्ध नसण्याचे मोठे आव्हान होते. सरकारने हा भेदभाव संपवला आणि महाराष्ट्रातील युवकांना मराठी भाषेतून वैद्यकीय शिक्षण घेता येईल, युवक मातृभाषेतून शिक्षण घेऊन डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करतील, असेही ते म्हणाले.

    देशातील आरोग्य सेवेतील परिवर्तनाबाबत पंतप्रधान श्री.मोदी म्हणाले, “आज प्रत्येक गरीब व्यक्तीकडे मोफत वैद्यकीय उपचारांसाठी आयुष्मान कार्ड आहे”. 70 वर्षांवरील वृद्धांनाही आता मोफत वैद्यकीय उपचार मिळत आहेत. जनौषधी केंद्रांमध्ये अत्यावश्यक औषधे अत्यंत कमी दरात उपलब्ध आहेत तसेच हृदयविकाराच्या रुग्णांना हव्या असलेल्या स्टेंट्सच्या किंमती देखील 80 ते 85 टक्क्यांनी कमी करण्यात आल्या आहेत. सरकारने कर्करोगावरील उपचारासाठी आवश्यक असलेल्या औषधांच्या किंमतीदेखील आता कमी केल्या आहेत. सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालये यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे आता वैद्यकीय उपचार स्वस्त झाले आहेत.

    आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधान म्हणाले की, महाराष्ट्राला बळकट करणे, हा विद्यमान सरकारचा संकल्प आहे. त्यांनी राज्याच्या प्रगतीच्या गतीबद्दल आनंद व्यक्त केला आणि आजच्या सर्व विकास प्रकल्पांसाठी महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन केले.

 


🙏👇👇👇👇👇👇👇👇👇🙏


           देश मेरा वतन समाचार पत्र 


         संपादक श्री दयाशंकर गुुुप्ता जी 


नोट........ 


दोस्तों उम्मीद करता हूं कि आप सभी, यह आर्टिकल को अंत तक पढ़े होंगे एवं यह आर्टिकल आपको बेहद पसंद आया होगा, जिसके लिए आप हमारे इस आर्टिकल को लाइक शेयर व कमेंट जरूर करेंगे । 🙏 जनहित लोकहित के लिए धन्यवाद 


Comments

Popular posts from this blog

30 सितंबर से 31 अक्टूबर 2024 तक बढ़ा दिया गया हैतक कर लें राशन कार्ड की E-KYC, वरना नहीं मिलेगा फ्री राशन ?

बदल गए राशन कार्ड के सभी नियम, नए नियम जारी

भिवंडी निजामपुरा शहर महानगरपालिका क्षेत्र में धमणकर नाका ब्रिज के नीचे और चौक-चौराहों पर कचरे का अंबार, बिगड़ रही सेहत व शहर की सूरत